रत्नागिरी - जिल्ह्याला आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला. खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसला. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटसह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. अचानक बरसलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. दरम्यान, या पावसामुळे आंबा बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
गेले काही दिवसात वातावरणात कमालीचा बदल झालेला आहे, त्यात उष्माही वाढला होता. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. यामुळे पावसाची शक्यता दाट शक्यता होती. अखेर दुपारनंतर मेघ गर्जनेसह पाऊस बरसायला सुरुवात झाली. सुरुवातीला गुहागर, खेड, चिपळूण, संगमेश्वरमध्ये मुसळधार बरसणाऱ्या पावसाने मग रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातही काही ठिकाणी वादळी-वाऱ्यासह हजेरी लावली.
जिल्ह्यातील बहुतांश गावात मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, या महिन्यात सलग तिसऱ्यांदा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.
हेही वाचा - रत्नागिरीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क बंधनकारक, अन्यथा 500 रुपयांचा दंड