रत्नागिरी - जिल्ह्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत 100 टक्के घरांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली आहे. दोन वेळा केलेल्या या सर्व्हेक्षणात 277 कोरोनाचे रुग्ण, तर सारीचे 337 आणि इलीचे 2 हजार 689 रुग्ण शोधण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
4 लाख 40 हजार 572 घरांचे सर्व्हेक्षण करण्याचे उद्दिष्ट
कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकसंख्येला दोन वेळा भेटी देऊन संशयित कोविड रुग्णांचा शोध घेण्यात आला. 15 सप्टेंबर 2020 पासून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम दोन टप्प्यांमध्ये घेण्यात आली. पहिली फेरी 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आली. तर, दुसरी फेरी 14 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात आली. त्यामध्ये, 15 लाख 42 हजार 612 लोकसंख्या आणि 4 लाख 40 हजार 572 घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यासाठी 686 पथकांमध्ये 2 हजार 29 कर्मचारी कार्यरत होते. या मोहिमेसाठी विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली आहे. तसेच, विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले.
...या आजाराचे रुग्ण सापडले
पहिल्या टप्प्यात कोरोनाचे 291, तर दुसऱ्या टप्प्यात 67, असे एकूण 277 रुग्ण शोधण्यात आले. पहिल्या टप्प्यात सारीचे 270, तर दुसऱ्या टप्प्यात 67 रुग्ण, असे एकूण 337 रुग्ण सापडले. पहिल्या टप्प्यात इलीचे 2 हजार 91 आणि दुसऱ्या 598, असे एकूण 2 हजार 689 रुग्ण शोधण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
पहिल्या टप्प्यात कोमॉर्बिड आजाराचे म्हणजेच, डायबेटिस, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, किडनी विकार इत्यादी प्रकारचे 1 लाख 12 हजार 79 रुग्ण, तर दुसऱ्या टप्प्यात 97 हजार 776 रुग्ण आढळून आले.
हेही वाचा - जिल्हा बँकेच्या पगारदार खातेदारांना विम्याचं कवच ; संचालक मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय