रत्नागिरी - नाणार राहिले आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प घालवला, नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत आम्ही जनतेला दिलेला शब्द पाळला, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते नाणार रिफानरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर आज रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेना कधी विकासाच्या आड येणारी नाही, पण कोकणात चांगले प्रकल्प येत असतील आणि तिथल्या जनतेला विश्वासात घेवून ते होत असतील तर होवू देत, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. रत्नागिरीत आज शिवसेनेच्या वतीने भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला ठाकरे यांनी हजेरी लावली. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ठाकरे यांनी वधू दाम्पत्याना आशीर्वाद देताना भांडू नका, नांदा सौख्य भरे, असा आशीर्वाद दिला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नाणारसंदर्भात बोलताना नाणारवासियांचे कौतुक केले. केवळ कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मतांचा आदर शिवसेना करेल असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत रिफानयरी प्रकल्प नाणार येथून रद्द झाल्याचे राजपत्र सादर केले.