रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यातल्या धामापूर येथील बंधाऱ्यात दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे दोघेही आपल्या मित्रांसोबत शनिवारी या बंधाऱ्यात पोहायला गेले होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली. यश रवींद्र महाडिक (20 वर्षे) आणि विजय विश्वास भालेकर (23 वर्षे) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील धामापूर - भायजेवाडीत गोमुख बंधारा आहे. मुसळधार पावसामुळे हा बंधारा सध्या भरून वाहत आहे. शनिवारी दुपारी या बंधाऱ्यात पाच मित्र पोहायला गेले होते. वकास युसूफ शेख (वय 22,रा. चिपळूण), महंमद उमर नेवरेकर (वय 19, रा. चिपळूण), रोशन गणेश चाचे (वय 19, रा. उक्ताड, चिपळूण), विजय विश्वास भालेकर (वय 23, रा. पीर धामापूर, भूसेवाडी, संगमेश्वर), यश रविंद्र महाडिक (वय 20 रा. भेलेवाडी, कुंभारखणी खुर्द, संगमेश्वर) असे पाच मित्र शनिवारी दुपारच्या सुमारास या ठिकाणी पोहण्यास गेले होते. मात्र, यांच्यापैकी विजय भालेकर आणि यश महाडिक या दोघांचा या बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.