रत्नागिरी : रविवारी (ता.२३) दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. दरम्यान, गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले दोघेजण बुडाल्याची घटना रत्नागिरीत घडली. फणसोप टाकळे येथे काजळी नदीच्या पात्रात उतरलेले हे दोघेजण बेपत्ता झाल्याने गणेश विसर्जन सोहळ्याला गालबोट लागले. रविवारी संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. सत्यवान उर्फ बाबय पिलणकर (48), विशाल पिलणकर (28) अशी बेपत्ता झालेल्या दोघांची नावे आहेत.
दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन रविवारी पारंपारीक पद्धतीने करण्यात आले. दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील फणसोप टाकळे येथील गणपती विसर्जन काजळी खाडीमध्ये केले जाते. सायंकाळी गणपती विसर्जनासाठी किनारी भागात आणला होता. दरम्यान सत्यवान पिलणकर, विशाल पिलणकर हे दोघे मूर्ती विसर्जनासाठी नदी पात्रात उतरले होते. यावेळी पाण्यात अचानक भोवरा तयार झाला. त्यामध्ये दोघेही सापडले. दोघेही बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. परंतु, दोघेही पाण्यात बेपत्ता झाले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरु होता. ही घटना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस निरिक्षक अनिल लाड यांनीही आपल्या अन्य सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. रात्री, उशीरा उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. दोघे बेपत्ता झाल्याची नोंद शहर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.