रत्नागिरी - जगबुडी नदीची पाणीपातळी वाढल्याने जगबुडी पुलावरील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास महामार्ग बंद करण्यात आला होता.
जगबुडी नदीतील पाणी ओसरल्याने सकाळी साडेआठ वाजता वाहतूक सुरू करण्यात आली. तब्बल 9 तासांनंतर वाहतूक सुरू झाली होती. मात्र, पुन्हा जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीची धोक्याची पातळी 7 मीटर आहे. सध्या नदीची पाणीपातळी 8.40 मीटर झाली आहे. त्यामुळे आज (शनिवार) सकाळी साडेदहा वाजता जगबुडी पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुपारी 2 वाजता देखील जगबुडी नदीची पाणीपातळी 8.50 मीटर इतकी होती. त्यामुळे वाहतूक बंदच आहे.