रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित जगबुडी नदीवरील नवीन पुल अखेर वाहतुकीसाठी आज खुला करण्यात आला आहे. नाट्यमय घडामोडीनंतर छोट्या वाहनांसाठी हा पूल अखेर सुरू करण्यात आला आहे. अधिकारी, खासदार सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत हा पुल सुरू करण्यात आला.
मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरची वाहतूक गेल्या 2 महिन्यांत पावसामुळे वारंवार बंद करण्यात आली होती. त्यामुळे जगबुडीवरच्या नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, ऐन पावसाळ्यात या पुलाचा जोडरस्ता खचल्याने वाहनधराकांची मोठी गोची झाली होती. त्यानंतर या रस्त्याची डागडुजी सुरू झाली. दरम्यान, गणेशोत्सव जवळ आला आहे. मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात येत असतात त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी सुरु करण्यासाठी राष्ट्रवादीने 8 दिवसांपुर्वी प्रशासनाला अल्टीमेटम दिला होता.
त्यामुळे आज राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे, खेडचे आमदार संजय कदम, आमदार भास्कर जाधव या पुलाच्या पाहणीसाठी जगबुडी नदीवरच्या पुलावर पोहोचले. पुल छोट्या वाहतुकीसाठी खुला केला जावू शकतो का? याचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून अखेर महामार्गाच्या अधिकाऱ्यांना खासदार सुनिल तटकरे यांनी स्वतःच्या गाडीत बसवत हा नवीन पुल छोट्या वाहनांसाठी सुरु केला. खेडचे आमदार संजय कदम यांनी गाडी चालवली आणि भास्कर जाधव यांच्या सोबत अधिकाऱ्यांना बसवत या पुलावरून पहिली गाडी सुनील तटकरे यांनी नेत हा पुल सुरु केला.
सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांच्या सहमतीने ही वाहतूक सुरू करून घेतली. त्यामुळे गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही खुशखबर असणार आहे. दरम्यान, पुलाच्या निकृष्ट कामाबद्दल ठेकेदाराची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार असून या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी आपण त्यांच्याकडे करणार असल्याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले.