रत्नागिरी - राज्य शासनाच्या आदेशानुसार खेडमध्ये स्थानिक प्रशासनाने दुकाने बंद करण्यास सुरुवात केल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापऱ्यांनी दुकाने बंद करण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर प्रशासनाने पोलिसांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहरातील व्यावसायिक आणखीनच संतप्त झाले. दुकाने बंद ठेवायला सांगत असाल तर आम्ही आमच्या दुकानांची आणि घरची विजेची बिले, दुकानात काम करणाऱ्या कामगारांचा पगार, दुकानाचे भाडे, व्यापाऱ्यांची देणी द्यायची कशी, असे प्रश्न उपस्थित करत दुकानदारांनी दुकाने बंद करण्यास विरोध दर्शवला.
प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरले धारेवर
त्यानंतर सर्व व्यापाऱ्यांनी पालिकेच्या सभागृहात गोंधळ घालत प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी सुमारे दोनशेहून अधिक व्यापारी उपस्थित होते. या व्यापाऱ्यांनी प्रातांधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पोलीस निरिक्षक निशा जाधव आणि मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना घेराव घालत अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी प्रातांधिकारी सोनोने यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत आम्ही केवळ शासनाच्या आदेशाचे पालन करत आहोत, असे सांगितले. मात्र, व्यापारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हॉटेल व्यवसायिकांनी सकाळी तयार केलेल्या मालाचे काय करायचे, हा प्रश्न हॉटेल व्यवसायिकांनी उपस्थित केला. मात्र, या प्रश्नाचे उत्तर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे नव्हते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी करणे ही काळाची गरज असली तरी ज्या पद्धतीने खेडमध्ये टाळेबंदी लादली जात आहे ते आम्हाला मान्य नाही, कोरोनाच्या नावाखाली गेले अनेक महिने बंद असलेला व्यवसाय आता कुठे सुरू झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा व्यवसाय बंद करणे आम्हाला परवडणारे नसल्याने आम्ही दुकाने बंद ठेवणार नाही, असा पवित्रा व्यावसायिकांनी घेतला. त्यामुळे दुकाने बंद करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली.
नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी काढली समजूत
उपस्थित व्यापारी आणि अधिकारी वर्गाची समजूत काढत नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सुवर्णमध्य काढला. सायंकाळी पाच वाजता व्यापारी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर संतप्त झालेले व्यापारी काही अशी शांत झाले.
हेही वाचा - दुर्मीळ खवल्या मांजराच्या तस्करप्रकरणी सहा जणांना अटक