रत्नागिरी - कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनला दोन महिने झाले आहेत. सध्या चौथा लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, या कोरोनाच्या लढाईत अनेक सर्व सामान्यांचे हाल होत आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचेही हाल तर बघवत नाहीयेत. पर्यटनावर अवलंबून असणारे तर हतबल झाले आहेत.
दरवर्षी कोकणात लाखो पर्यटक येत असतात. कोकणातील अनेक पर्यटन स्थळे जगप्रसिद्ध आहेत. त्यात गेल्या काही वर्षांत गोव्यात पर्यटकांना मिळणाऱ्या सोयीसुविधा कोकणातही मिळू लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांची पावलं कोकणात स्थिरावू लागली आहेत. पर्यटन वाढत असल्याने साहजिकच त्यावर आधारित अनेक छोटे-मोठे रोजगार इथे निर्माण झाले. मात्र या कोरोनामुळे हे रोजगार धोक्यात आले आहेत. कुटुंब कसे चालवायचे, या विवंचनेत सध्या ते आहेत.
विशाल शिंदे या त्यापैकीच एक. मूळचा धुळे जिल्ह्यातील असलेला विशाल गेल्या १५ वर्षांपासून गणपतीपुळेत आहे. त्याचा रोजगार हा इथल्या पर्यटनावर अवलंबून होता. इथे आलेल्या पर्यटकांना उंटाची सफारी घडवण्याचे काम तो करायचा. त्याच्याकडे ४ उंट आहेत. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे पर्यटन बंद असल्याने विशाल यांचा व्यवसायही ठप्प आहे. त्यामुळे कोकणात पर्यटकांना उंट सफारी घडवणाऱ्या विशाल यांना सध्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीचा सामना करावा लागतोय.
पर्यटन बंद असल्याने, व्यवसाय ठप्प, व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक चणचण. हातात पैसा नसल्याने उंटांचं खाद्य आणायचे कसे, त्यांना काय खायला घालायचे तसेच कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. एकीकडे उटांच्या चाऱ्याचा प्रश्न तर दुसरीकडे कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा हा प्रश्न शिंदे कुटुंबीयांसमोर आहे. पण आज ना उद्या हे सर्व सुरळीत सुरू होईल, हा आशेवर सध्या शिंदे कुटुंबीय दिवस ढकलत आहे.