रत्नागिरी - जिल्ह्यात आणखी 2 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी रात्री प्रशासनाला हे अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे शून्यावर आलेली कोरोना रुग्णांची संख्या दोन दिवसांत 4 वर गेली आहे. यापूर्वी 6 रुग्ण जिल्ह्यात सापडले होते. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 10 वर पोहचली आहे. यापूर्वी सापडलेल्या 6 रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू तर 5 जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. शनिवारी जिल्ह्यात दोन जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. एक चिपळूण तर एक संगमेश्वरमधील हे रुग्ण होते, हे दोघेही मुंबई आणि ठाण्यातून आले होते.
त्यानंतर रविवारी संध्याकाळी उशिरा पुन्हा एकदा दोन जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोघेही मुंबईतून आलेले आहेत. यामध्ये मुंबईतून मंडणगडमधील तिढे येथे चालत आलेला एक व्यक्ती असून दुसरा रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील पूर गावची महिला आहे. दोन्ही रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते व त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. रविवारी आलेल्या अहवालानुसार दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे दोन दिवसात ऍक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 वर पोहचली आहे. याआधी 6 रुग्ण होते, आता 4 असे 10 रुग्ण झाले आहेत. येत्या काही दिवसात हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे..