रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळाने रत्नागिरीतील मंडणगड आणि दापोली तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एका केंद्रीय पथकाने आज या नुकसानीची पाहणी केली. मंडणगड आणि दापोली तालुक्यातील आंबडवे, शिगवण, केळशी, आडेपाडले, पाजपंढरी आदी गावांना केंद्रीय पथकाने भेट दिली. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी रमेश कुमार गांता यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने पाहणी केली.
नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज सकाळी जिल्ह्यात दाखल झाले. मंडणगड येथील विश्रामगृहात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पावर पॉईंटद्वारे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती या पथकाला दिली. चक्रीवादळात घरांचे झालेले नुकसान, फळबागांचे नुकसान आणि खंडीत झालेल्या वीज पुरवठ्याबाबत विविध या पथकाने माहिती घेतली. त्यानंतर या पथकाने नुकसानग्रस्त गावांच्या पाहणीला सुरुवात केली. सुरुवातीला या पथकाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे गावाला भेट दिली. या पथकाने बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या अडचणी या पथकासमोर मांडल्या.
त्यानंतर पथकाने शिगवण गावातील नुकसानीची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला. शिगवण गावाला वादळाचा मोठा फटका बसला आहे. येथील जवळपास 90 टक्के घरांचे नुकसान झाले आहे. अनेकांची घरे पडल्याने हे ग्रामस्थ शाळेमध्ये आश्रयाला आहेत. शिगवण गावानंतर केळशी, आडेपाडले, पाजपंढरी, मुरुड आदी गावांमधील नुकसानीची पाहणी या पथकाने केली.