रत्नागिरी - चाकरमान्यांची नाळ नेहमीच आपल्या गावाशी जुळलेली असते. संकटात गावकरी आपल्या चाकरमान्यांसाठी कसे धाऊन येतात, याचे अनोखे उदाहरण रत्नागिरी जवळच्या टेंभ्ये-हातिस गावात पहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवासाठी गावाकडे न येणाऱ्या चाकरमान्यांच्या घरात गावकरी गणेशोत्सव साजरा करणार आहेत. कोरोनातील लॉकडाऊनमुळे दरवर्षीची गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी हातिस-टेंभ्ये येथील ग्राम कृतिदलाने ही सकारात्मक संकल्पना राबवली आहे. चाकरमान्यांच्या घरात गावातील ग्रामस्थ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत आणि विधिवत पूजाअर्चा करून दीड दिवसानंतर गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे.
गणेशोत्सव आणि चाकरमानी यांचे नाते अतूट आहे. आपल्या लाडक्या बाप्पासाठी चाकरमानी एक दिवस गावाकडे येतोच येतो. यावर्षी मात्र गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे चाकरमान्यांना गावी येण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. ज्या चाकरमान्यांना गावाकडे यायचे होते, त्यांच्यासाठी दहा दिवसांचा विलगीकरण कालावधी ठेवण्यात आला होता. मुंबईतून आल्यानंतर गावी दहा दिवस विलगीकरण, पाच दिवसांचा गणेशोत्सव आणि पुन्हा मुंबईत गेल्यानंतर तिकडे चौदा दिवस विलगीकरण या अटींमुळे नोकरदार मंडळींना गावाकडे येणे अशक्य आहे. एका दिवसासाठी यायचे म्हटले तरीही कोरोना चाचणी अत्यावश्यक केली आहे. त्यामुळे अनेकांना गावी येणे शक्य नाही, या परिस्थितीमध्ये गावाकडील बंद घरात गणेशोत्सवाची पूजाअर्चा कशी होणार अशीच हुरहूर अनेकांना आहे.
यावर हातिस-टेंभ्ये ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच कांचन नागवेकर यांनी अभिनव संकल्पना पुढे आणली आहे. मुंबईकर चाकरमान्यांशी संवाद साधून ज्यांना येणे शक्य नाही, त्यांच्या घरात वाडीतील कृतिदल गणेशोत्सव साजरा करेल, अशी ही संकल्पना आहे. गणेशोत्सवापूर्वी चाकरमान्यांच्या स्वागतासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांविषयी कृतिदलाची बैठक झाली. त्यामध्ये सर्वांनी चर्चा करून यावर निर्णय घेतला. याबाबत मुंबईकर चाकरमान्यांनाही कल्पना देण्यात आली त्यांनीही या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
गावाकडून ही संकल्पना सांगितल्यानंतर त्याला लगेचच काही चाकरमान्यांनी होकार दिला. गणेशमूर्तीपासून ते मखराच्या सजावटीपर्यंत सर्व ग्रामस्थ करणार आहेत. बाप्पाच्या या उत्सवाचा काही खर्च ग्रामकृती दल उचलणार आहे तर काही खर्च हा मुंबईतील चाकरमानी गावाकडे पाठवून देणार आहे.
टेंभ्ये-हातीस ग्रुप ग्रामपंचायतीची ही संकल्पना आदर्शवत असून मुंबईकर चाकरमान्यांची गावाकडील घरी गणपती आणण्याची इच्छापूर्ती करणेही शक्य होणार आहे. सध्या जिल्ह्यात या ग्रामपंचायतीच्या अनोख्या संकल्पनेची चर्चा आहे.