रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका राजापूर तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांना बसला आहे. जोरदार वारा आणि पावसामुळे किनारपट्टीवरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. शिवाय काही ठिकाणी रस्त्यांवर झाडेही कोसळली आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने या भागातील कुटुंबांचे वेळीच स्थलांतर केल्याने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
चक्रीवादळाचा धोका हा समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या गावांना अधिक असल्याने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाने सकाळीच किनारपट्टीवरील कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती. आंबोलगड येथील 68 कुटुंबातील 254 व्यक्तींचे, मुसाकाझी येथील दोन कुटुंब, आवळीचीवाडी येथील 7 कुटुंबातील 35 व्यक्तींचे, माडबन येथील 20 घरातील 78 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.
घरांचे मोठे नुकसान
दुपारी किनारपट्टीवरील भागात जोरदार वारा आणि पाऊस कोसळू लागला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांची, झाडांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये आंबोळगड येथील श्री गगनगिरी महाराजांच्या मठावरील कौले उडाली. तसेच अंबोळगड येथील वाडेकर यांचा गोठ्यावर झाड पडून, तर दिपक अनंत पारकर यांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर उडाल्याने नुकसान झाले आहे.
हेही वाचा -Cyclone Tauktae : सिंधुदुर्गात तौत्के चक्रीवादळाचे थैमान, महामार्गावरील अपघातात एकाच मृत्यू