रत्नागिरी - व्यवसाय प्रशिक्षणासाठी तामिळनाडूतून रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीत आलेल्या दोनशे विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला. मात्र, महाराष्ट्र सरकार आणि रत्नागिरी पोलिसांनी या विद्यार्थ्यांना मदत केली. त्यामुळे तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी महाराष्ट्र शासन आणि पोलिसांचे आभार मानले आहेत.
![तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्वीट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6617477_thumbnail.jpg)
जवळचे साहित्य संपल्यानंतर जेवण मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडे सोशल मीडियाद्वारे मदतीची मागणी केली. त्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. ठाकरे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना विद्यार्थ्यांना अत्यावश्यक साहित्य देण्याचे आदेश दिले होते. डॉ. मुंढे यांनी तत्काळ याची दखल घेत सर्व विद्यार्थ्यांची जेवणाची आणि उर्वरित दिवसांसाठी जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था केली. या विद्यार्थ्यांना आत्ताच जिल्हा सोडण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचेही डॉ. मुंढे यांनी स्पष्ट केले.
वस्तू खरेदी-विक्रीचे (मार्केटिंग) प्रशिक्षण घेण्यासाठी तामिळनाडूतील विद्यार्थी मिरजोळे एमआयडीसीत येतात. येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर ते पुन्हा तामिळनाडूला जातात. प्रशिक्षणासाठी सध्या तामिळनाडूतून आलेल्या नव्या तुकडीला कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका बसला.