रत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमने रत्नागिरी तालुक्यातील एका महिलेवर अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. शस्त्रक्रिया करून या महिलेच्या पोटातून तब्बल साडेनऊ किलोचा गर्भाशयाचा ट्युमर बाहेर काढण्यात आला. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे.
रत्नागिरी तालुक्यातील जयगड नजीकच्या कचरे येथील ३५ वर्षीय शीला दत्ताराम हळदणकर या पोटातील विकाराच्या आजाराने त्रस्त होत्या. सुमारे सात वर्षे त्यांच्या पोटात असलेली गाठ दिवसेंदिवस वाढत होती. स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर तात्पुरता आराम मिळत होता.
महिनाभरापूर्वी त्यांच्या पोटात गर्भाशयाच्या पिशवी जवळ ट्युमरची मोठी गाठ असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांनी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. शस्त्रक्रियेसाठी दाखल केल्यानंतर अखेरच्या क्षणी ही शस्त्रक्रिया येथे होणार नाही, मुंबई किंवा पुणे येथील मोठ्या रुग्णालयात जावे लागेल असा सल्ला खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी नातेवाईकांनी शीला हळदणकर यांना जिल्हा रुग्णालयात आणले.
जिल्हा रुग्णालयात रुग्णाला आणल्यानंतर प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर विनोद सांगवीकर यांनी रुग्णाची तपासणी केली आणि शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याने त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बोल्डे यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही आपण स्वतः शस्त्रक्रियेसाठी येऊ, असे सांगितले. शीला हळदणकर यांच्यावर शनिवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले आणि आज शीला यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अडीच तासांच्या अथक प्रयत्नाने गर्भाशयाच्या पिशवी जवळील साडेनऊ किलोचा ट्युमर बाहेर काढण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले.
ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होती. गाठ मोठी असल्याने अनेक छोट्या रक्तवाहिन्या त्याला जोडल्या गेल्या होत्या. त्या सर्वप्रथम बाजूला करून ट्युमर काढण्याचे आव्हानात्मक काम डॉक्टर विनोद सांगवीकर व डॉ. बोल्डे यांनी यशस्वी केले.
मोठ्या अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया महानगरासह मोठ्या खासगी रुग्णालयात होतात. यासाठी रुग्णांना लाख रुपये मोजावे लागतात. मात्र, जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रथमच एवढी मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या धाडशी प्रयत्नाचे रत्नागिरीकरांकडून कौतुक होत आहे.