रत्नागिरी- ध्येय नेहमी उत्तुंग ठेवून त्यादृष्टिने काम करण्याची तयारी केली पाहिजे. ते गाठण्यासाठी आपण प्रयत्नशील असणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी म्हटले आहे. शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, रत्नागिरी यांच्यामार्फत आयोजित मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते रा.भा. शिर्के हायस्कुल येथे विद्यार्थ्यांशी बोलत होते.
ते म्हणाले, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडियासारखे उपक्रम हाती घेतले असून यासाठीदेखील कुशल युवकांची गरज भासणार आहे. आपण आपले करिअर निवडतांना बाजारात ज्या क्षेत्रात गरज आहे त्यात सहभाग घेतला पाहिजे आणि यशस्वी होण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याची धमक आपल्यात असणे गरजेचे असल्याचे ते बोलले.
तंत्र शिक्षणाबाबत बोलतांना ते म्हणालेत, तंत्र शिक्षण घेतल्याने आपल्यात तांत्रिक क्षमता निर्माण होते. तंत्रशिक्षण घेतल्याने आपण एक कुशल पर्यवेक्षक होऊ शकतो. खाजगी व सरकारी नोकरीची संधी निर्माण होऊ शकते किंवा या शेत्रात आपण स्वताचे व्यवसायही सुरु करता येत असल्याची माहिती त्यांनी दिली. याचबरोबर त्यांनी रत्नागिरीमधील एच. एनर्जी, मुंबई गोवा हायवे चौपदरीकरण, चिपळूण कराड महामार्ग, जयगड डिंगणी रेल्वे अशा अनेक मोठ्या प्रकल्पाचे उद्हारणे देऊन यांसारख्या ठिकाणी कुशल तांत्रिक क्षमता असणाऱ्या युवकांची गरज भासत असल्याची माहिती त्यांनी दिली.
जीवनात कोणतीही गोष्ट करताना त्यामध्ये प्रामाणिकपणा, सातत्य, सत्यता, एकाग्रता, आत्मविश्वास असणे गरजेच आहे, तरच आपण कोणत्याही क्षेत्रातात उत्तम प्रकारे काम करू शकतो. असा यशाचा मूलमंत्रसुद्धा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिला. कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्यांची दखल समाजाला घ्यावी लागते. त्यामुळे आपल्या जीवनात आमुलाग्र बदल होईल आणि आपण आपल्या जीवनात यशस्वी व्हाल, असा विश्वास व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांनी मेळाव्यामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यासाठी १० वी, १२ वीचे विद्यार्थी, विद्यार्थीनी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.