रत्नागिरी - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील मेडिकल वगळता अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आजपासून बंद ठेवण्यात आली आहेत. प्रशासनाकडूनही निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
कोरोनाचा विळखा घट्ट होतोय
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत आहे. शुक्रवारी एका दिवसात 500पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे. यापूर्वी अत्यावश्यक सेवेतील दुकानं सुरू होती. मात्र अनेकजण अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली अगदी क्षुल्लक कारणांसाठी बाहेर पडताना दिसत होते. त्यामुळे निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
नव्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी
नव्या निर्बंधानुसार मेडिकल, भाजी, दूध, फळे वगळता इतर दुकाने पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. दरम्यान मेडिकल बरोबरच भाजी, दूध, फळे व्यवसायिकांना आपली कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. तसेच चाचणी निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र दुकानात ठेवणे आवश्यक आहे. किराणा दुकानांनी दुकाने सुरू न ठेवता मालाची घरपोच सेवा देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. मात्र, आज मेडिकल वगळता इतर सर्वच दुकाने बंद होती. किराणा मालाची दुकानेही पूर्णतः बंद होती. नव्या निर्बंधांची प्रशासनाकडून अगदी कडक अंमलबजावणी होत आहे.