रत्नागिरी - औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे यासाठी शिवसेना पहिल्यापासून आग्रही आहे. मात्र, राज ठाकरे गेल्या सात-आठ वर्षात बेहाल झाले आहेत, राज ठाकरेंना कुठेही पाय ठेवायला जागा नाही म्हणून नवीन जागा शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची जळजळीत टीका राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. ते आज रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की, राज ठाकरे गेल्या सात-आठ वर्षात बेहाल झाल्यामुळे झेंडा बदलणे, रंग बदलणे, अजून काय बदलणे त्यासाठी राज ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच संभाजीनगरच्या बाबतीत राज ठाकरेंची अवस्था 'तुम्हारे खत में हमारा सलाम' अशीच असल्याचा टोला सत्तार यांनी लगावला. औरंगाबाद शहराचे नाव 'संभाजीनगर' करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केली आहे. १९८८ पासून ही मागणी शिवसेनेची होती. औरंगाबादचे नाव बदलले तर काय हरकत आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी शुक्रवारी उपस्थित केला होता. त्यापार्श्वभूमीवर सत्तार यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
नाणारबाबत शिवसेनेने आपली भूमिका बदलेली नाही - सत्तार
नाणारबाबत शिवसेनेने आपली कुठलीही भूमिका बदलेली नाही, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. तसेच जाहिरात कोणी द्यावी, ती कशी छापून यावी हा वेगळा मुद्दा आहे. मात्र, नाणारबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शब्द हा अंतिम राहणार असल्याचेही सत्तार यावेळी म्हणाले.
हेही वाचा - भूमिका बदलून काही लोक आज सत्तेत, राज ठाकरेंचा शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला
हेही वाचा - जनतेत जाऊन मिसळा; राज ठाकरे यांची मेळाव्यात कार्यकर्त्यांना सूचना