रत्नागिरी - तिवरे धरण दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकाने सोमवारी घटनास्थळाची पाहणी केली. जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे हे या पथकाचे प्रमुख आहेत. तर, पथकामध्ये जलसंधारण विभागातील मुख्य अभियंता (लघुसिंचन), रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा समावेश आहे.
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यामुळे 22 जण बेपत्ता झाले होते. त्यातील 20 जणांचे मृतदेह सापडले तर 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या दुर्घटनेला जबाबदार कोण, प्रशासनाचा हलगर्जीपणा नडला की ठेकेदार जबाबदार? असे अनेक प्रश्न या दुर्घटनेमुळे उपस्थित झाले होते. दरम्यान सरकारकडून 6 जुलै रोजी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात आले होते. त्यानुसार हे पथक सोमवारी तिवरे इथे दाखल झाले. त्यापूर्वी चिपळूणमध्ये या पथकाची बैठक झाली. त्यानंतर दुपारी हे पथक घटनास्थळी गेले. ज्या ठिकाणी धरण फुटलं त्या ठिकाणाची पाहणी या पथकाने केली. तसेच जिथून घरे वाहून गेली त्या ठिकाणची सुध्दा या पथकाने पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानुसार तिवरे धरण फुटीच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर जबाबदारी निश्चित करणे, त्यानुसार अनुषंगिक चौकशी करणे, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाय योजना सुचविणे ही या चौकशी पथकाची जबाबदारी आहे. या पथकाला 2 महिन्यात आपला चौकशी अहवाल सादर करायचा आहे.