रत्नागिरी- जिल्ह्यात सध्या दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. धक्कादायक म्हणजे जिल्हा रुग्णालयातल्या प्रसूती विभागातील 6 मातांना कोरोनाची लागण झाली. या विभागातील एका नर्सला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा हादरली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा शासकीय रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयातील इतर विभाग दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहेत. मात्र प्रसूती विभाग तिथेच ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या विभागातील महिला नर्सचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे प्रसूती विभागात दाखल असलेल्या 21 महिलांसह वैद्यकीय अधिकारी, नर्स व इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी प्रसूती विभागात दाखल असलेल्या 6 मातांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर वैद्यकीय अधिकारी, इतर स्टाफ यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
एकाच वेळी जिल्हा रुग्णालयात एकाच वेळी 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. दरम्यान, प्रसूती विभागातील इतर 14 महिलांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर नवजात बालकांच्या स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.