रत्नागिरी - वनविभागाला वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२अंतर्गत विशिष्ट संरक्षण मिळालेले दुर्मीळ असे जिवंत खवले मांजर विक्रीसाठी येणार असल्याचे समजले होते. मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुख्य वनसंरक्षक (प्रा), डॉ. क्लेमेंट बेन यांचे मार्गदर्शनाखाली वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य तथा मानद वन्यजीवरक्षक सातारा रोहन भाटे व विभागीय वनअधिकारी, दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख, वनक्षेत्रपाल आर. आर. पाटील यांनी खेड चिपळूण रा. महामार्ग. क्र. १७ रस्त्यावर खेड रेल्वे स्टेशनजवळील साईबाबा ढाबाजवळ सापळा रचण्यात आला होता.
दोन दुचाकी वाहनेही जप्त
संशयित खवले मांजर विक्रीसाठी आल्यावर आणलेल्या पोत्यामध्ये जिवंत खवले मांजर असल्याची खात्री झाल्यावर तत्काळ चार जणांना चारचाकी गाडीमध्येच ताब्यात घेण्यात आले. तर इतर दोन जणांना जवळपासच्या भागातून ताब्यात घेण्यात आले. या सहा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेकडून तस्करी करण्यासाठी आणलेले खवले मांजर ताब्यात घेण्यात आले. तसेच गुन्हेकामी वापरलेल्या दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.
पकडलेल्या आरोपींची नावे
- १) महेश विजय शिंदे, वय - ३५, रा. खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी
- २) उद्धव नाना साठे, वय - ३८, रा. ठाणे, जि. ठाणे
- ३) अंकुश रामचंद्र मोरे, वय - ४८ रा. पोखळवणे, ता. दापोली, जि. रत्नागिरी
- ४) समीर सुभाष मोरे, वय - २१, रा. पोखळवणे, ता. दापोली, जि. रत्नागिरी
- ५) अरूण लक्ष्मण सावंत, वय - ५२ रा. ठाणे, जि. ठाणे
- ६) अभिजीत भार्गव सागावकर वय-३२ रा. सुकवली, ता. खेड, जि. रत्नागिरी
अशी आहे शिक्षेची तरतूद
खवल्या मांजर ही एक दुर्मीळ सस्तन प्राण्यांची प्रजाती आहे. वन्यजीव अधिनियम, १९७२अंतर्गत या प्राण्याला वाघाएवढेच संरक्षण दिले आहे. जगात वाघाच्या खालोखाल सर्वात जास्त तस्करी या प्राण्यांची होते. खवले मांजर हा प्राणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२अंतर्गत अनुसूची १मध्ये येत असून सदर प्राण्याची शिकार करणे, तस्करी करणे किंवा जवळ बाळगणे यासाठी सात वर्ष सक्त कारावास व १०, ००० हजार रूपये दंड अशी तरतूद आहे.