रत्नागिरी - तिवरे धरण दुर्घटनेप्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकाने आज घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी पथकाने गावकऱ्यांची कहाणी ऐकून घेतली. तसेच दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने गावकऱ्यांशी साधलेला संवाद.
गेल्या ३ जुलैला रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले होते. या दुर्घटनेत २३ जण वाहून गेले होते. त्यापैकी २१ जणांचे मृतदेह सापडले आहेत. ग्रामस्थांनी या धरणाला गळती लागल्याच्या तक्रारी वारंवार केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने लक्ष दिले नाही. शेवटी धरण फुटून लोकांना जीव गमवावा लागला.
सरकारने दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली. याच चौकशी पथकाने आज घटनास्थळाला भेट दिली. यावेळी चौकशी समितीमधील सद्स्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी धरण फुटण्यापूर्वीची दुरवस्था पथकासमोर कथन केली. धरणाला गळती लागल्यानंतर कितीवेळा आवाज उठवला? याबद्दल चौकशी समितीला माहिती देण्यात आली. त्यानंतर धरणाच्या गळतीबाबत प्रशासनाला पत्रव्यवहार करणाऱ्या दोघा भावंडांना घेऊन समितीने धरणाची पाहणी केली. समितीच्या सद्स्यांनी गावकऱ्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्यामुळे दोषींवर नक्की कारवाई होणार, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.