रत्नागिरी - जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी आता पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा फटका रत्नागिरीकरांना बसू लागला आहे. गेल्या २ दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील विविध नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे रत्नागिरीत पेट्रोल-डिझेल घेऊन येणाऱ्या गाड्या मध्येच अडकल्या असल्याने पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या दिसत आहेत.
सांगली जिल्ह्यातील इंधन डेपोमधून टँकर रत्नागिरी जिल्ह्यात येतात. मात्र, इंधनाच्या गाड्या अडकल्याने रत्नागिरी शहरात सध्या पेट्रोल टंचाई पहायला मिळतेय. पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर सध्या १ ते २ किलोमिटरच्या रांगा पहायला मिळत आहेत. आंबाघाट देखील बंद असल्याने पेट्रोल-डिझेल गाड्या रत्नागिरीत आलेल्या नाहीत.
अशीच परिस्थिती राहिली तर, सायंकाळनंतर पेट्रोल पंप बंद राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी शहराला दिवसाला हजारो लिटर इंधनाची गरज आहे. मात्र, त्यातील २० टक्के साठासुद्धा शिल्लक नसल्याने पेट्रोलची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.