रत्नागिरी - आजही मध्यावधी निवडणुका झाल्या तर शिवसेनेचे किमान 100 आमदार निवडून येतील. उदय सामंत किंवा दीपक केसरकर यांचा आयत्या बिळात नागोबाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश झालेला होता. त्यांच्यामुळे शिवसेना वाढलेली नाही, शिवसेनेने त्यांना वाढवलेले आहे, अशा शब्दांत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेत उदय सामंत आणि दीपक केसरकर यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. ते काल चिपळूणमध्ये बोलत होते.
हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार.. काही नद्यांनी ओलांडली इशारा पातळी, चिपळूणमध्ये पाणी तुंबलं
तर शिवसेनेचे किमान 100 आमदार निवडून येतील - शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी बंडखोरांचा जोरदार समाचार घेतला. चिपळूणमध्ये बोलताना खासदार राऊत म्हणाले की, शिवसेना पक्ष आजही मजबुतीने उभा आहे. जे आमदार खरेदी - विक्रीच्या बाजारात विकले गेले आहेत त्यांची आम्हाला मुळीच चिंता नाही. सर्व बंडखोरांच्या विरोधात आणि भाजपच्या कपट कारस्थानाविरोधात आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार, आणि जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर शिवसेनेचे किमान 100 आमदार महाराष्ट्रातील जनता निवडून देईल ही आम्हाला खात्री आहे, असे विनायक राऊत यावेळी म्हणाले.
शिवसेना उद्धव साहेबांचीच, बंडखोरांची नाही - दरम्यान रत्नागिरीतील शिवसेना ही शिवसेनेचीच आहे. उदय सामंत किंवा दीपक केसरकर हे शिवसेनेत आलेले होते. आयत्या बिळात नागोबाप्रमाणे त्यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला होता. त्यांच्यामुळे शिवसेना वाढलेली नाही, शिवसेनेने त्यांना वाढवले आहे, त्यामुळे ही शिवसेना उद्धव साहेबांचीच शिवसेना आहे बंडखोरांची नाही, अशा शब्दांत खासदार राऊत यांनी उदय सामंत आणि दीपक केसरकर यांचा समाचार घेतला.
मेळाव्यात येण्याचा सामंत यांना अधिकार नाही - राऊत : दरम्यान शिवसेनेचा रत्नागिरीत 10 तारखेला जो मेळावा होणार आहे, त्यामध्ये येण्याचा उदय सामंत यांना नैतिक अधिकार नाही, आणि त्यांनी येऊही नये, असsही राऊत यांनी आमदार सामंत यांना सुनावले आहे. दरम्यान आम्ही शिवसैनिक आहोत असे म्हणण्याचा नैतिक अधिकार बंडखोरांना नाही, जर हिम्मत असेल तर सांगा आम्ही भाजपवासी झालो आहोत. शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून दिले आणि आता तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी भाजपमध्ये गेलात आणि आता शिवसेना पक्ष विकायला चालला आहात. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.
हेही वाचा - Shivsena Active In Ratnagiri : रत्नागिरीत शिवसेना झाली सक्रीय, 10 जुलैला मेळावा