रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळाने कोकण भागात जोरदार तडाखा दिला, या घटनेला आता एक महिना पुर्ण झाला. याच पार्श्वभूमीवर दापोली-खेड मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीदरम्यान सुमारे अर्धा तास त्यांनी नुकसानग्रस्त भागातील परिस्थिती, बाधितांना नुकसान भरपाई तसेच विविध उद्योगांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकरी, उद्योजकांच्या कर्जमाफीबाबत चर्चा केली.
फळबागांमध्ये प्रामुख्याने आंबा आणि इतर फळबागांचे नुकसान अधिक प्रमाणावर झाले आहे. या वादळात नुकसान झालेल्या घरांप्रमाणे मोठ्या प्रमाणात बागायतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बागायतीच्या प्रत्येक झाडामागे मदत मिळावी, अशी मागणी खेड दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्याचप्रमाणे शेती कर्ज घेतलेल्या बागायतदारांची कर्जमाफी करावी, अशी मागणी करण्यात आली. प्रत्येक झाडामागे मदत देण्यासाठी सकारात्मक विचार होईल, असे आश्वासन योगेश कदम यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
हेही वाचा - 104 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात; रुग्णालयातील सर्वांनी केला कौतुकाचा वर्षाव
आमदार योगेश कदम यांनी केलेल्या मागण्या...
आमदार योगेश कदम यांनी ज्या मागण्या केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने फळबागधारकांना नुकसानभरपाई देताना झाडांच्या संख्येप्रमाणे मदत मिळावी, तसेच त्या झाडांच्या वय व त्याचे वार्षिक उत्पन्न ग्राह्य धरून ही नुकसानभरपाई द्यावी. फळबाग लागवडीसाठी रोजगार हमी योजनेचा बाधित शेतकऱ्यांना पुन्हा लाभ मिळण्यासाठी ही योजना पुनर्जीवित करावी. या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या जमिनीची २ हेक्टरची अट शिथिल करावी. यासोबतच रोजगार हमी योजनेंतर्गत बागायतींच्या सफाईसाठी १०० दिवस मनुष्यबळ भरवण्याची मुभा मिळावी. कृषी व कृषी व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्याना कर्जमाफी द्यावी. तसेच एनसीडीसी मार्फत कर्ज घेतलेल्या मच्छीमारांना त्या कर्ज व कर्जाच्या व्याजातून मुक्तता द्यावी, या मागण्या केल्या आहेत.
तसेच, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना आणि न्याहरी निवास योजनेतील कर्जदारांना कर्ज माफ करणे, कर्जात सवलत देणे, कर्ज भरण्यासाठी मुदत वाढ देणे व कर्जावरील थकीत व्याज माफ करणे. तसेच चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहक तारांचे नुकसान झाले असून, आता नुकसानग्रस्त गावांमध्ये भूमिगत विद्युत पुरवठा करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या आमदार योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्या आहेत. त्यावर सकारात्मक प्रतिसाद दाखवून, लवकरच कोकणाला न्याय मिळेल असे ठोस कार्य केले जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.