रत्नागिरी - रिफायनरीच्या विरोधात येणाऱ्या एनजीओना हद्दपार केलं पाहिजे आणि भविष्यात या एनजीओना आम्ही हुसकावून लावणारच, असा इशारा शिवसेना आमदार राजन साळवी यांनी दिला आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. प्रस्तावित धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. दरम्यान हा प्रकल्प झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका शिवसेना आमदार राजन साळवी यांनी घेतली आहे.
'एनजीओना हद्दपार केलं पाहिजे' - आज एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत स्थानिक सरपंच, प्रशासक यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. या बैठकीला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जाणार असल्याचं शिवसेना आमदार राजन साळवी यांनी सष्ट केलं. दरम्यान, रिफायनरीच्या विरोधात येणाऱ्या एनजीओना हद्दपार केलं पाहिजे, असं आमदार राजन साळवी यांनी म्हटलं आहे. हा आमचा ग्रामीण भाग आहे. त्यांच्या सुखदुःखासाठी आम्ही समर्थ आहोत. या एनजीओनी इथे येऊन आमच्या लोकांची माथी भडकवायची. त्यांना चुकीचं प्रबोधन करायचं, त्यानंतर ती भूमिका त्या लोकांनी घेतल्यानतर त्याचा त्रास इथल्या स्थानिक जनतेला होतो. त्यामुळे या एनजीओना त्या त्या भागात संबंध नसेल तर त्यांनी या भागात येऊ नये, त्यांना अटकाव करावा, अशी भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे आणि भविष्यात या एनजीओंना आम्ही हुसकावून लावणारच, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला आहे.
हेही वाचा - Chandrakant Patil New Prediction : 2024 च्या निवडणुकीसाठी चंद्रकांत पाटील यांचे नवीन भाकीत, म्हणाले....