रत्नागिरी - शिवसेनेचे जिल्हा परिषद शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी अखेर आज (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, ज्येष्ठ नेते तानाजी चोरगे, शेखर निकम यांच्या उपस्थितीत मंगळवारी बेटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चिपळूणमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. दरम्यान सहदेव बेटकर हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
सहदेव बेटकर संगमेश्वर तालुक्यातील माखजन जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून निवडून आले होते. वर्षभरापूर्वी पक्षाने त्यांना जिल्हा परिषदमधील शिक्षण व अर्थ सभापती पदाची जबाबदारी दिली होती. दरम्यान गेली दोन वर्षे बेटकर यांचे नाव गुहागर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी शिवसेनेकडून चर्चेत होते. आपल्याला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीसाठी तयारी करा, असे सांगितल्याचे बेटकर सांगतात. पण गेल्या महिन्यात भास्कर जाधव शिवसेनेत आल्यामुळे बेटकर यांचे नाव मागे पडले. त्यामुळे ते नाराज होते. दरम्यान ते राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे यांचीही भेट घेत घेतली होती.
हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : सहदेव बेटकरांनी सोडले 'शिवबंधन', राष्ट्र्वादीकडून लढवणार निवडणूक
अखेर शिवसेनेकडून आपल्याला उमेदवारी मिळणार नाही याची खात्री झाल्यावर आणि राष्ट्रवादीकडून हिरवा कंदील मिळाल्यावर बेटकर यांनी सोमवारी आपल्या पदाचा व पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर मंगळवारी बेटकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. बेटकर आता गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता जर या मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी झाली नाही तर भास्कर जाधव आणि सहदेव बेटकर यांच्यामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - रत्नागिरीत पाचही जागांसाठी शिवसेनेकडून उमेदवारांना 'एबी फॉर्म'