रत्नागिरी - माजी मंत्री आणि गुहागरचे आत्ताचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव ग्रामदैवतेच्या मंदिरात गोंधळ घालत एका वृद्ध नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भास्कर जाधवांनी तुरंबव येथील ग्रामदेवता शारदा देवीच्या मंदिरात मोठा गोंधळ घातला. मंदिराच्या आतमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडिओ आता समोर आला आहे. यात मोबाईल शूट करणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला जाधव बेदम मारताना व्हिडिओत दिसत आहेत. आमदार भास्कर जाधव यांचे चिपळूण तालुक्यातील तुरंबव हे मूळ गाव आहे. शारदा देवी मंदिर विश्वस्तचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ कमिटीची बैठक सुरू होती, त्यावेळी हा प्रकार घडला.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या बैठकीमध्ये येत भास्कर जाधव यांनी गोंधळ घातला. मंदिरातच भास्कर जाधवांनी शिव्यांची लाखोली वाहिली. दरम्यान मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला रागाच्या भरात त्यांनी जोरदार मारहाण केली. भास्कर जाधव या वृद्धाच्या अंगावर धावूम गेलेले व्हिडिओमध्ये दिसत आहे. शिवाय शिव्या देतानाचा त्यांचा व्हिडिओ अगोदरच व्हायरल झाला होता. आता मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालेला समोर आला आहे. यासंदर्भातील कुठलीही तक्रार अद्याप नोंदवलेली नाही. मात्र, मंदिर बंद असताना मंदिरात सुरू असलेली बैठक देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मारहाण आणि शिवीगाळीचा हा व्हिडिओ ६ ऑक्टोबरचा आहे.
हेही वाचा - कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत महाविद्यालये सुरू करण्याचा विचार नाही - उदय सामंत
यावर भास्कर जाधव यांनी खुलासा केला आहे की, या बैठकीमध्ये वाद निर्माण होत असल्याचे मला लोकांकडून सांगण्यात आले होते. वाद होऊ नयेत यासाठी मी तेथे गेलो आणि मध्यस्ती करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होतो. मला कुठलेही समर्थन करण्याची आवश्यकता नाही. परंतु, उपस्थित काही जणांनी विषयाला वेगळे वळण दिल्याने माझा संयम सुटला. हा सर्व प्रकार सुरू असताना एकाने याचा व्हिडिओ केला आणि हा व्हिडिओ राजकारणातील विरोधकांच्या हाती देऊन व्हायरल केला.