रत्नागिरी - शिवसेनेने यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असे विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनंत गिते यांनी केले ( Anant Geete On Eknath Shinde Group ) आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. महाराष्ट्राला शिवसेना म्हणून सामोरे जावे, तशी विनंती मी उद्धव ठाकरेंना करणार आहे. उभा महाराष्ट्र शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वीकारल्याशिवाय राहणार नाही, असेही अनंत गिते यांनी हे म्हणाले.
एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका - शिवसेनेतील बंडखोरीनंतर अनंत गीते संघटनेत सक्रिय झाले आहेत. याबाबत बोलताना गीते म्हणाले की, मी उद्धव ठाकरे यांना रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात दौरा करणार याची कल्पना दिली आहे. शिवसेना संकटात असताना पाठीशी राहणे ही माझी नैतिक जबाबदारी असल्याचे गीते यावेळी म्हणाले. शिवसेना वर्ग करता येणार नाही, निवडणूक आयोग याबाबत योग्य तो निर्णय घेईल असेही गीते म्हणाले. तसेच गद्दार शब्द लागत असेल तर शिवसैनिक आहोत हे का सांगावे लागते, शिंदे गटाची दखल घेण्याची गरज नसल्याचे सांगत गीते यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली.
हा भाजप पुरस्कृत बंड - छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी स्वबळावर बंड केले. राणेंच्या बंडाला काँग्रेसने सहकार्य जरुर केले, पण त्या बंडाचे पुरस्कर्ते काँग्रेस नव्हती. त्या बंडाचे कारस्थान काँग्रेसने रचलेले नव्हते. मात्र सध्याचे बंड हे भाजप पुरस्कृत, भाजप रचित हे बंड असल्याची टीका गीते यांनी यावेळी केली.