चिपळूण(रत्नागिरी)– चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडी स्थित एका बंद कारखान्याच्या शेडमध्ये शालेय पोषण आहाराचा सडलेला साठा आढळून आला आहे. खडपोली ग्रामपंचायत व चिपळूण पंचायत समितीच्या सभापती धनश्री शिंदे यांनी या गोडाऊन वर धाड टाकून हा प्रकार उघड केला आहे. विशेष म्हणजे याच एमआयडीसीतून जिल्ह्याला पोषण आहाराचे धान्य वितरीत केले जात असल्याची माहिती मिळाली आहे.
डागलेल्या धान्य, खराब तांदुळ, बोगस मसाले याठिकाणी आढळून आले. तसेच गोडाऊनच्या चारही बाजूने घाणीचे साम्राज्य आहे. व गटारांची दुर्गंधी पसरलेली आहे. माशांमुळे या गोडावूनला घाणीचे स्वरुप आलेले आहे. सडलेल्या धान्याची पॅकींग येथे सुरू होती. याबाबत येथील कर्मचाऱ्यांना विचापूर केली असता, हे धान्य आम्ही जनावरांसाठी पॅकींग करीत असल्याचे सांगितले.
मात्र, हेच धान्य शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना याआधी दिले गेले असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. त्यामुळे या प्रकारची संपूर्ण माहिती घेऊन मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बचत गटावर कारवाई करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत महसूल अथवा कुठल्याही विभागाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले नव्हते. रात्री ठेकेदाराने बारा ट्रक या ठिकाणी लावून हे धान्य रातोरात हलविण्याचा प्रयत्न केला. यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले. त्यात व्यवस्थापकाचे काय करायचे ते करा, अशी भूमिका घेतल्यानंतर वातावरण अधिकच संतप्त झाले. चिपळूण शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सपकाळ यांनीही कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी व्यवस्थापकाला धारेवर धरण्यात आले.
या प्रकरणी जबाबदार व्यवस्थापकाला पोलीस स्थानकात आणण्यात आले. मात्र, शिरगाव पोलीस स्थानकाचे प्रमुख नायकवडी यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. हा विषय महसूलच्या अंतर्गत येत असल्यामुळे आपण याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करुन घेऊ शकत नाही, आपण आपले म्हणणे लेखी स्वरुपात द्या, असे त्यांनी सांगितले. खडपोली एमआयडीसीतील धान्यसाठा केलेल्या कंपनीत शेकडो ग्रामस्थ रात्री उशिरा जमा झाले होते. अखेर पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे संतप्त ग्रामस्थ माघारी फिरले. यावेळी खडपोलीच्या सरपंच रोशनी पवार, मुराद अडरेकर, उमेश सपकाळ, प्रिया भुवड, रेश्मा पवार, निसार शेख आदी स्थानिक उपस्थित होते.
दरम्यान, आमदार शेखर निकम आज शनिवारी घटनास्थळी भेट देणार आहेत. ते या विषयात काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत बालकांना अत्यंत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पोहोचवला जात असल्याने जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.