रत्नागिरी - जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर होणार आहे. त्यामुळे अनेकांची उत्सुकता ताणली आहे. आतापर्यंत एससी सर्वसाधारण, ओबीसी महिला आणि सर्वसाधारणला आरक्षण पडलेले नसल्याने अनेकांची उत्सूकता ताणली आहे.
हेही वाचा - मासे खातायत भाव! बदलत्या हवामानामुळे तुटवडा, भाव वधारले
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षित पदांचे जिल्हानिहाय वाटप करण्यासाठी 19 नोव्हेंबरला सकाळी साडेअकरा वाजता सोडत कार्यक्रम मुंबईत मंत्रालयामध्ये गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या उपस्थितीत होणार आहे. विधानसभा निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांसह सभापतींना 4 महिने वाढीव मुदत देण्यात आली आहे. सप्टेंबरला ही मूदत संपणार होती. अध्यक्षपदाचे आरक्षण पडेपर्यंत नवीन निवड शक्य नाही. त्यामुळे आरक्षणाकडे सर्वच सदस्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - राज्य नाट्य स्पर्धेला आजपासून सुरुवात, कोकण विभागात11 नाटकांची चुरस
गेल्या 20 वर्षांमध्ये एससी सर्वसाधारण, ओबीसी महिला आणि सर्वसधारणसाठी संधी मिळालेली नाही. मागीलवेळी सर्वसाधारण महिला हे आरक्षण होते. त्यात रत्नागिरी आणि लांजा तालुक्यांना संधी मिळाली होती. एससीमधून हातखंबा गटाचे सदस्य परशुराम कदम, वाटदच्या ॠतुजा जाधव हे सदस्य निवडून आले आहेत.
अध्यक्षपदासाठी यावेळी सर्वसाधारणसाठी संधी राहील, असा बहूतांश सदस्यांचा अंदाज आहे. त्यामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य उदय बने, अण्णा कदम, रोहन बने, बाबू म्हाप, बाळशेट जाधव यांच्यासह अनेक इच्छुकांचा यादीत समावेश आहे. 2000 ला सर्वसाधारणमधून आबा घोसाळे आणि राजेंद्र महाडिक यांनी अध्यक्षपद भुषवले होते. त्यानंतर सर्वसाधारणला संधी न मिळाल्याने आरक्षणाकडे सर्वच जणांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदाचे आरक्षण पडल्यानंतर काही दिवसांनी निवडणूका लागतील. त्यानंतर विद्यमान सभापतींना राजीनामे द्यावे लागतील. त्यांच्याही नव्याने निवडणूक होण्याची शक्यता आहे.