रत्नागिरी - देशभर सध्या महिलांवरील अत्याचाराचा विषय गाजत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातही नाझनीन सुर्वे या विवाहितेचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात आहे. नाझनीन हिचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला. मात्र, या प्रकरणी पोलीस माहेरच्याच लोकांना अटकेची भिती दाखवत आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
29 नोव्हेंबरला नाझनीनची प्रकृती ठिक नसल्यामुळे दवाखान्यात घेऊन जात असल्याचा फोन तिच्या वडिलांना आला. यानंतर तत्काळ त्यांनी दवाखान्यात धाव घेतली. तेथे गेल्यानंतर नाझनीनने आत्महत्या केल्याचे त्यांना सांगण्यात आले.
नाझनीनने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचा संशय तिच्या माहेरच्या नातेवाईकांना आला. त्यामुळे तिच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले. खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी त्यांना सहकार्य न करता, उलट प्रश्नांचा भडिमार केला. एफआयर देखील घेण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप नाझनीनचे वडील आणि तिच्या इतर नातेवाईकांनी केला आहे.
नाझनीनच्या नातेवाईक असलेल्या डॉ. फरहाना अल्वी यांनीही ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. अल्वी यांनी काही वैद्यकीय प्रश्न उपस्थित केले आहेत.
या प्रकरणी नाझनीनच्या पतीला अटक केली असून तपास योग्य रीतीने सुरू असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली. मात्र, नाझनीनच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांबाबत विचारणा केली असता, त्याबाबत बोलने त्यांनी टाळले. पोलिसांकडे पहिल्या दिवसापासूनचे कायदेशीर पुरावे आहेत, अशी माहिती सुवर्णा पत्की यांनी दिली.
दरम्यान, नाझनीनच्या मृत्यूचा योग्य रीतीने तपास होत नाही. त्यामुळे हा तपास खेड पोलिसांऐवजी दुसऱ्या यंत्रणेकडे द्यावा. योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नाझनीनच्या नातेवाईकांनी दिला आहे.