रत्नागिरी - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची लोटे येथील मालमत्ता स्थानिक ग्रामस्थ रविंद्र दत्ताराम काते यांनी लिलावात घेतली आहे. काते यांनी लिलावात भाग घेऊन व सर्वाधिक बोली लावून १ कोटी १० लाख १० हजार ५१ या किमतीला ही मालमत्ता खरेदी केली . सेफेमा यांनी हा ऑनलाईन लिलाव मंगळवारी (१ डिसेंबर) आयोजित केला होता, हा लिलाव स्थानिक ग्रामस्थ रविंद्र काते यांनी जिंकला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरचा लिलाव व्हिडीओ कॉन्सफरन्सद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.
यापूर्वी ६ मालमत्तांचा झाला होता लिलाव
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांचा लिलाव नोव्हेंबरमध्ये झाला होता. १० नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या या लिलावात एकूण ७ मालमत्तेपैकी ६ मालमत्तेचा लिलाव ऑनलाईन पद्धतीने झाला होता. या मालमत्ता दिल्लीतील वकिल अजय श्रीवास्तव आणि भुपेंद्रकुमार भारद्वाज यांनी घेतल्या होत्या. मात्र त्यावेळी लोटे येथील मालमत्तेचा लिलाव झाला नव्हता. त्यामुळे हा लिलाव १ डिसेंबर रोजी ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता. लोटे येथे दाऊदने खरेदी केलेला हा भूखंड होता.
सर्वाधिक बोली लावत काते यांनी लोटेतील जागा घेतली
या मालमत्तेची आधार किंमत १ कोटी ९ लाख १५ हजार ५०० रुपये होती. लोटेतील दाऊदची ही मालमत्ता लिलावात कोण घेणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. या लिलावासाठी दिल्ली येथील वकिल भारद्वाज आणि खेड तालुक्यातील घाणेखुंट गावचे रहिवासी रविंद्र काते यांनी सहभाग नोंदवला होता. त्याप्रमाणे सदरचा लिलाव घाणेखुंटचे रहिवासी रविंद्र काते यांनी जिंकला असून त्यांच्या नावाची घोषणा संबधीत यंत्रणेने केल्याची माहिती आहे.