रत्नागिरी - पावसाळ्यात कोकणचे सौंदर्य हे आणखी खुलून येते. हिरवळ आणि धबधब्यांनी नटलेला कोकण अनेकांना भुरळ घालतो. पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांची पावले आपोआप रत्नागिरीतील नैसर्गिक धबधब्यांकडे वळतात. यावर्षी मात्र, कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील धबधबे ओस पडले आहेत.
सध्या राज्यात कोरोनाचे संकट आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यातील वर्षा पर्यटनावर बंदी घातली आहे. पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिकांनाही धबधब्यांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी धबधब्यांवर गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक धबधबे सध्या प्रवाहित झाले आहेत. पानवल, उक्षी, रानपाट, सवतसडा अशा धबधब्यांचे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक रत्नागिरीत येत असतात. मात्र, सध्या या धबधब्यांवर जाण्यास मज्जाव आहे. त्यामुळे दरवर्षी पर्यटकांनी ओसंडून वाहणारे हे धबधबे पर्यटकांशिवाय ओस पडले आहेत.
दरम्यान, यावर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील उन्हाळी पर्यटनाला मोठा फटका बसला. त्यापाठोपाठ आता पावसाळी पर्यटनही बंद करण्यात आले. परिणामी पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेकडो नागरिकांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.