रत्नागिरी - एस.टी डेपोत डिझेल नसल्याने बुधवारी पहाटे पासून गाड्याच सुटल्या नाहीत. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. शहर बस सेवा पूर्ण ठप्प झाली आहे. डिझेलचा खडखडाट झाल्याने दोन दिवसात ग्रामीण आणि शहरी भागातील 400 पेक्षा जास्त फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. डिझेल टॅकर आल्यावर दुपारनंतर वाहतूक पूर्ववत सुरू होईल, असे एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
रत्नागिरी एसटी डेपोची सेवा पुर्णपणे ठप्प झाली आहे. एसटी विभागाला डिझेल पुरवठा न झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मंगळवारी दुपारपासूनच रत्नागिरी एसटी डेपोच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
एसटीच्या शहरी आणि ग्रामीणच्या 439 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. डिझेलचे पैसे न भरल्यामुळे ही परिस्थिती एसटी विभागावर आली. एसटीची सेवा ठप्प झाल्याने कॉलेज, शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घर गाठण्याची नामुष्की ओढावली. अनेक वयोवृध्दांना बसस्टॉपवर ताटकळत राहावे लागेले, कामासाठी बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्याना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागला. मात्र, डिझेल नसल्याने एसटीची सेवा बंद ठेवण्याची नामुष्की इथल्या प्रशासनावर आली. रत्नागिरी शहर बसस्थानकातून या दोन दिवसात 346 फेऱ्या रद्द करण्यात आल्या तर ग्रामीणच्या 93 फेऱ्या रद्द केल्या गेल्या. शहर बसनेच विद्यार्थ्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते, डिझेल नसल्याने येथील डेपोत सर्व बसेस एका रांगेत लावून ठेवण्यात आल्या होत्या. बुधवारी डिझेल टँकर आल्यानंतर वाहतूक पूर्ववत होईल असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.