रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाऊन सुरू आहे. मात्र या कालावधीतही अनेकजण विनाकारण गाड्या घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. रत्नागिरी पोलिसांनी अशा नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कडक कारवाई केली आहे. गेल्या 24 दिवसांत म्हणजे 22 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंत अशा 11 हजार 761 वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत 40 लाख 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला गेला आहे.
इतक्या कमी कालावधीत इतक्या मोठया प्रमाणावर दंड वसूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. देशासह राज्यातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 वर गेली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आहे. मात्र, या संचारबंदीच्या कालावधीतदेखील लोक वाहने घेऊन विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात. अशा वाहनचालकांवर जिल्हा वाहतूक शाखेने कारवाईची जोरदार मोहिम राबवली.
गेल्या 24 दिवसाच्या कालावधीत वाहतूक शाखेने जवळपास 40 लाख 55 हजारांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई विना हेल्मेट फिरणाऱ्या वाहन चालकांवर करण्यात आली आहे. अशा 5 हजार 300वाहन चालकांकडून 26 लाख 50 हजार रक्कम वसूल करण्यात आली आहे. सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या 471 चालकांना 94 हजार 200, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या 36 जणांकडून 7 हजार 200 , इन्शुरन्स नसणाऱ्या 23 जणांकडून 30 हजार 700 , लायसन्स नसणाऱ्या 173 वाहन चालकांना 86 हजार 500, फॅन्सी नंबर वापरणाऱ्या 273 जणांना 59 हजार 400, अधिकृत कागदपत्र नसणाऱ्या 2 हजार 310 जणांना 4 लाख 62 हजार , ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या 71 जणांना 14 हजार 200 आणि इतर 2 हजार 821 जणांकडून 5 लाख 83 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याचाच आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.