रत्नागिरी - जिल्ह्यातील लोकांनी शिस्तीचे दर्शन घडवले. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा टिकाव लागला नाही. 03 मेनंतर जनजीवन सुरळीत होण्याच्या दृष्टीकोनातून रत्नागिरी जिल्ह्याला प्रथम संधी मिळावी यासाठी, आपण प्रयत्नशील आहोत, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे दिली.
परब यांनी महाराष्ट्र दिनानिमित्ताने समस्त जिल्हावासीयांना व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. या व्हिडिओ त्यांनी जिल्ह्यातील नागरिक आणि सर्व शासकीय यंत्रणेने घेतलेल्या मेहनतीबद्दल सर्वांचे अभिनंदन केलं आहे.
परब व्हिडिओच्या माध्यमातून म्हणाले, 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबले आहे. हे अर्थचक्र पुन्हा सुरू व्हावे आणि जनजीवन पूर्वपदावर यावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करीत आहेत. शिमग्यासाठी जिल्ह्यात आलेल्या आणि अडकलेल्या चाकरमान्यांना परत त्यांच्या गावापर्यंत पाठविण्याचे नियोजन सुरू आहे. याबाबतीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.'
जरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नसले तरी प्रत्येकाने योग्य ती काळजी घेणं गरजेचे आहे. आजवर केलेले सहकार्य असेच कायम ठेवावे, असे आवाहनही परब यांनी यावेळी केलं. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात सद्यघडीला एकही कोरोनाचा रुग्ण नाही. यामुळे हा जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे.
हेही वाचा - नाणीजच्या नरेंद्राचार्य महाराज संस्थानकडून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 52 लाख
हेही वाचा - रत्नागिरीत सोशल डिस्टन्सिंग पाळत महाराष्ट्र दिन साजरा, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण