रत्नागिरी - जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी रात्री तर काही ठिकाणी आज सकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.
जिल्ह्यातील बहूतांशी भागात मेघगर्जनेसह पाऊस -
वेधशाळेनं वर्तवलेला अंदाज खरा ठरवत अवकाळी पावसाने जिल्ह्यात मुसळधार बरसात केली. जिल्ह्यातील बहूतांशी भागात मेघगर्जनेसह पाऊस पडला. अनेक ठिकाणी मध्यरात्री पावसाला सुरुवात झाली आणि अक्षरश: धो धो पावसाने झोडपून काढले. चिपळूण, गमेश्वर, साखरपा, देवरुख या भागात मुसळधार पाऊस पडला. काही ठिकाणी पहाटे पावसाने बरसात केली. साखरपा तसेच आजूबाजूच्या परिसरात पहाटे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. पहाटे तीनच्या सुमारास जवळपास दीड तास पडणाऱ्या मुसळधार अवकाळी पावसाने साखरपा व आजूबाजूचा परिसर चांगलाच झोडपून काढला. या जोरदार पावसामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता. रस्त्यांवर पाणी साठले होते.
अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे उघड्यावर ठेवण्यात आलेल्या अनेकांच्या चीजवस्तू पावसात भिजून गेल्या. अचानक आलेल्या पावसामुळे चिपळूण तालुक्यातही अनेकांची तारांबळ उडाली. बाहेर वाळत टाकलेली हळद, कडधान्ये या पावसात भिजली.
आंबा पीक धोक्यात -
या अवकाळी पावसामुळं आंबा पिक मात्र अडचणीत आले आहे. आधीच यावर्षी आंबा पिकावर संक्रात ओढवली आहे. बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादन खुप कमी झालय आणि त्यात आता पडलेल्या पावसामुळे वेगळं संकट आंबा बागायतदारांसमोर निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त आहेत.