रत्नागिरी - निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिल्याने प्रशासनाचीही लगबग दिसून येत आहे. निवडणूक साहित्य नेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी निवडणूक साहित्य केंद्रावर सकाळपासून हजेरी लावलेली आहे. यासंबंधित निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्याशी बातचित केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात १३ लाख १० हजार ५५५ मतदारांची नोंदणी झाली आहे, तर ८४२ सर्व्हिस व्होटर जिल्ह्यात आहेत. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख २७ हजार ७९३ असून स्त्री मतदार ६ लाख ८२ हजार ७५२ एवढ्या आहेत. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस दल सज्ज झाले आहे. स्त्री मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात उमेदवारांचा कौल महिला मतदारांच्या हाती असल्याचेच दिसून येत आहे.
हे वाचलं का? - विधानसभेचे धुमशान.. ३,२३७ उमेदवारांपैकी महिला केवळ २३५ तर वयाची ८० पार केलेले चार उमेदवार रिंगणात
जिल्ह्यात १ हजार ७०३ मतदान केंद्र असून निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ११ हजार ४८ अधिकारी आणि कर्मचारी यांची माहिती संगणकीय प्रणालीमध्ये जमा करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १ हजार ७०३ मतदान केंद्रांसाठी १२५ टक्के प्रमाणे मतदान अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष (पीआरओ) २१३१, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष(एफपीओ)२१३१, इतर मतदान अधिकारी(ओपीओ) ४२६२, असे एकूण ८ हजार ५२४ मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. १४१ मतदान केंद्रावर मायक्रो ऑब्झर्व्हर नेमण्यात आले आहेत.