रत्नागिरी - काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी जाहीर केलेल्या नियुक्तीवर रत्नागिरी शहर काँग्रेसचे अध्यक्ष राकेश चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आजही रत्नागिरी शहर अध्यक्ष पदावर भोसले कार्यरत आहे. त्यामुळे नजर चुकीने आपण जिल्हा चिटणीस म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी केली आहे.
तीन दिवसांपूर्वी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये जिल्हा चिटणीसच्या यादीत राकेश चव्हाण यांचा समावेश आहे. या नियुक्तीला चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. चव्हाण यांना शहराध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याचे यापूर्वीच कळवण्यात आले होते. पण ही कारवाई मान्य नसून या पदावरून हटवण्याचे कोणतेही अधिकार जिल्हाध्यक्षांना नसल्याचे सांगितले. त्यामुळे आपण आजही शहराध्यक्ष पदावर कार्यरत आहे. त्याबाबत 9 डिसेंबर 2019 ला सकाळी 10.47 वाजता आपण माझ्या व्हॉटसअप क्रमांकावर एक पत्र पाठविले होते. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदामध्ये बदल झाल्यानंतर जिल्हा कार्यकारिणी त्याचप्रमाणे सर्व तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष बरखास्त झालेले आहेत. रत्नागिरी शहर अध्यक्ष पदावरून पदमुक्त करण्यात आलेले आहे असे कळविले आहे. प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये चिटणीस या तक्त्यामध्ये क्रमांक 14 ला आपले नाव यादीमध्ये चुकीने समाविष्ट करण्यात आलेले असल्याचे राकेश चव्हाण यांनी सांगितले आहे.
काँग्रेस भवन ही इमारत रत्नागिरी जिह्याच्या मुख्य ठिकाणी शहरात असून त्यापमाणे काँग्रेस भवनच्या चाव्या रत्नागिरी शहर अध्यक्ष, रत्नागिरी तालुका अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष यांचेकडे असतात. याची मला पूर्ण कल्पना व विश्वास आहे. पण या कार्यालयाची परस्पर कुलूप बदललात हे मला विश्वासात न घेता केलेले कृत्य आहे. त्याचे निश्चितच समर्थन करता येणार नाही. आपण यामध्ये प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना कल्पना देणे आवश्यक असल्याचे राकेश चव्हाण यांनी मागणी केली आहे.