रत्नागिरी - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणाजवळील वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर शहराला पाण्याविना रहावे लागते. पावसाळ्यात अनेक वेळा ही समस्या उद्भवते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विशेष निधीतून २ कोटी रुपये जनरेटर खरेदीसाठी पालिकेला मंजूर केले आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जनरेटरच्या माध्यमातून शीळ धरणातील पाणी उचलणे शक्य होणार आहे.
निम्म्या शहराला शिळ धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु, वीज पुरवठ्यावरच शीळ धरणातून पाणी उचलणे सद्यास्थितीत शक्य होते. शीळ धरणाच्या पंप हाऊसपर्यंत आलेली वीज वाहिनी ही जंगल मार्गे येत असल्याने ती अनेक वेळा नादुरुस्त होते. वीज वाहिनी तुटल्यानंतर ती दुरुस्त करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. यावेळेत शहराला शीळ धरणातून होणारा पाणी पुरवठा पुर्णतः बंद होतो.
शीळ धरणावरील जलपूरवठा योजनेसाठी जनरेटर घेण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे जनरेटर हा एकमेव पर्याय पालिकेसमोर होता. पालिकेच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. शहरवासियांसाठी २ कोटी रुपयांचा जनरेटर देणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी दिल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी २ कोटी रुपयांना मंजुरी दिली असली तरी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जनरेटरची खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे दोन महिन्यात पालिकेकडे नवा जनरेटर उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा- रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर ट्रक-रिक्षाचा भीषण अपघात; 13 वर्षीय मुलासह वडिलांचा मृत्यू