रत्नागिरी - जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाचा जोर अधिक वाढला आहे. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर काहीसा मंदावला होता. मात्र, रात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. या पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून खोळंबलेली शेतीची कामे पुन्हा सुरू झाली आहेत.
मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. सध्या सुरू असलेला पाऊस असाच बरसत राहिला तर नद्यांना पूर येऊन सखल भागात पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. रत्नागिरीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. जिल्हात चिपळूण, गुहागर या दोन तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली, खेड, मंडणगड या ठिकाणीही पावसाची रिपरिप सुरूच आहे. चिपळूणमध्ये वाशिष्टी नदीची पातळी वाढल्याने दोन दिवसांपूर्वीच बाजार पुलाला पाणी लागले. प्रशासनाने नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.