रत्नागिरी - नाणार रिफायनरीला समर्थन केल्याने सागवे गटाचे विभागप्रमुख राजा काजवे यांची बुधवारी पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र, उचलबांगडी प्रकरणाचे पडसाद आता राजापूर तालुक्यात उमटू लागले आहेत. राजा काजवे यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक म्हणत या कारवाईच्या निषेधार्थ आणि काजवे यांच्या समर्थनार्थ राजापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.
त्यामध्ये कात्रादेवीचे उपविभागप्रमुख मंगशे मांजरेकर आणि परिसरातील शिवसेनेच्या 22 शाखाप्रमुखांचा समावेश आहे. अधिसूचना रद्द झालेला नाणार रिफायनरी प्रकल्प राजापूरमध्येच व्हावा यासाठी समर्थकांची संख्या वाढत आहे. राजापूर तालुक्यातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी या प्रकल्पाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. दरम्यान, या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर रिफायनरी समर्थक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. यातली पहिली कारवाई सागवे जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख राजा दत्ताराम काजवे यांच्यावर करण्यात आली होती. त्यांची पदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी कमलाकर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कदम यांच्या नियुक्तीचे पत्रदेखील जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी बुधवारी त्यांना दिले. मात्र, या कारवाईचा शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे. राजा काजवे यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच या कारवाईच्या निषेधार्थ आणि काजवे यांच्या समर्थनार्थ या 23 पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे शिवसेनेच्या राजापूर तालुका प्रमुखांकडे दिले आहेत.
त्यामध्ये शिवसेनेचे कात्रादेवीचे उपविभाग प्रमुख मंगेश मांजरेकर, तसेच सागवे शाखाप्रमुख प्रकाश पारकर, तुळसुंदे शाखाप्रमुख निवास शिरगांवकर आशा 22 शाखाप्रमुखांचा समावेश आहे. या पदाधिकाऱ्यांचाही रिफायनरीला पाठिंबा आहे. त्यामुळे राजापूरमधील शिवसेनेतीलच पदाधिकारी रिफायनरीसाठी सकारात्मक आक्रमक भूमिका घेत असल्याने आमदार, खासदार आणखी काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -
नागपूर न्याायालयात वकिलांचा जोरदार युक्तिवाद, फडणवीसांबाबत पुढील सुनावणी 30 मार्चला
यवतमाळ जिल्ह्याला दोन जिल्हाधिकारी? प्रशासनाचा गोंधळ की जाणून बुजून नियुक्ती