रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (MH CM Uddhav Thackeray) यांनी रिफायनरीबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे आम्ही सर्व स्थानिक शिवसैनिक खूष आहोत आणि आम्ही सर्वजण ठामपणे त्यांच्या भूमिकेपाठीमागे उभे आहोत, असे आमदार राजन साळवी यांनी म्हटलं आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ घातलेला होता. तिथल्या स्थानिक जनतेचा या प्रकल्पाला विरोध होता. त्याला शिवसेनेने पाठींबा दिला आणि त्यानंतर त्यावेळेचे पक्षप्रमुख, आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो प्रकल्प रद्द करून घेतला, असेही ते म्हणाले.
दरम्यान बारसू, सोलगाव, देवाचे गोठणे या परिसरामध्ये हा प्रकल्प आला पाहिजे अशी स्थानिक जनतेने मागणी केल्यानंतर मा मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसुत यावा असं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेलं आहे, हे सर्वांना ज्ञात आहेच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेमुळे आम्ही सर्व इथले स्थानिक शिवसैनिक खूष आहोत. कारण कोकणात कोणाताही मोठा असा रोजगार नाही. या प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, चांगल्या प्रकारे विकास येथे होईल असा विश्वास राजन साळवी यांनी व्यक्त केला. तसेच भविष्यात हा प्रकल्प या ठिकाणी व्हावा अशीच आम्हा सर्व स्थानिकांची मागणी आहे असेही राजन साळवी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - Yogi Govt On Bhonga : योगी सरकारचे भोंग्यांवर बुलडोजर! 11 हजार भोंगे हटवले