रत्नागिरी ( चिपळूण ) : राज ठाकरे यांनी चिपळूणमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आगामी काळात मनसेची राजकारणातील तयारी याबाबत मार्गदर्शन केले. राज्यात सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडत नाही, असे राजकारण आम्हालाही मान्य नाही, असे राज ठाकरे म्हणाले. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून त्यांचे कौतुक करणाऱ्या राज यांनी आज पहिल्यांदाच फडणवीस यांच्या भूमिकेवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची नक्कल : राज म्हणाले, काल एक मुलाखत पाहत होतो. तेव्हा देवेंद्र म्हणाले होते, मी राजकारणी आहे. राजकारणी म्हणून काही तडजोडी कराव्या लागतात. मात्र काँग्रेससोबत कधीही तडजोड करणार नाही. कारण काँग्रेस हा वेगळ्या विचारांचा पक्ष आहे. फडणवीस जर काँग्रेसला वेगळ्या विचारांचा पक्ष म्हणत असतील तर, राष्ट्रवादी कसल्या विचारांचा आहे? अशी टीका करत राज यांनी देवेंद्र फडणवीस यांची नक्कल केली.
संपत्ती खाणारे माझ्या पक्षात नको : राजकारण्यांनी कोकणात बक्कळ संपत्ती जमवली. प्रकल्पांच्या नावाखाली पैसा खाल्ला जातो. प्रकल्पाची जागा नाणार येथे होती, मग ती बारसू येथे कशी गेली? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. कोकण खाऊन संपत्ती जमा करणारी व्यक्ती मला माझ्या पक्षात नको आहे असे देखील ते म्हणाले.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले : यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात होत असलेल्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली. आज सोळा वर्षांपासून हे काम सुरू आहे. मात्र या महामार्गाबाबत कोणी निवडून आलेले खासदार तोंड का उघडत नाही अशी टीका देखील त्यांनी भाजप सरकारवर केली आहे.
पुढील आमदार मनसेचाच : दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघाचा पुढील आमदार मनसेचाच असेल, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने कामाला सुरुवात करा. त्यासाठीच राज ठाकरे यांनी मंडणगड तालुकाध्यक्ष, कार्यकारिणीला मुंबई भेटीचे खास निमंत्रण दिले आहे. लवकरच बैठक होणार आहे. तुम्हालाही कामाची पद्धत समजावून दिली जाईल. मी पुन्हा मंडणगडला दौऱ्यावर येईन. तेव्हा तुमच्याच कुणाच्या तरी घरी जेवेन. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंडणगडच्या सभेत ‘मी कोणासोबत जेवू यावरून भांडू नका’ असा प्रेमळ सल्ला दिला आहे.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis: राजकारणासाठी फडणवीस पोहरादेवीला खोटे पाडत आहेत, संजय राऊतांचा आरोप