रत्नागिरी - दिवाळी उलटून गेली तरीही कोकण रेल्वे कामगारांना 2019 चा बोनस मिळालेला नाही. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात कर्मचार्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हा प्रश्न सोडवण्यात मान्यता प्राप्त नॅशनल रेल्वे मजदूर युनियन यशस्वी ठरली नाही. या विरोधात रेल कामगार सेना आणि कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनिअनने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोकण रेल्वेच्या कामगारांना दिवाळीला बोनस दिला जातो. मात्र, यावर्षी दिवाळी सण होऊनही अजूनपर्यंत बोनस मिळालेला नाही. हा बोनस मिळेल या प्रतीक्षेत कामगार होते. मात्र, त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मान्यताप्राप्त युनियनकडून याविरोधात आवाज उठविण्याची गरज होती. गतवर्षी दिवाळीपूर्वी बोनस जाहीर करण्यात आला होता. त्यावेळीही रेल्वे कामगार सेनेने आवाज उठवला होता. दिवाळी होऊन पाच दिवस झाले तरीही बोनस देण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली झालेल्या नाहीत. आचारसंहिता असल्याचे थातूरमातूर कारण रेल्वे प्रशासनाकडून दिले जात आहे. त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. येत्या दहा दिवसात त्यावर कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करण्याचा पवित्राही कर्मचार्यांनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन रेल्वे कामगार सेना आणि एम्प्लॉईन युनिअनच्या पदाधिकार्यांनी संयुक्तपणे दिले. यावेळी केआरसीचे अध्यक्ष सुभाष मळगी, दिवाकर देव, संजय जोशी, नरेंद्र शिंदे, राजू सुरती, मोहन खेडेकर, विलास खेडेकर, उमेश गाळवणकर, जयगरा नायर, रवींद्र गुजर, जी. के. दळवी उपस्थित होते.