रत्नागिरी - विहिरीत पडलेल्या रानगव्याला जीवनदान देण्यात वनविभागाला यश आले आहे. राजापूर तालुक्यातील आंगले गावातील ही घटना आहे. गावातील मनुष्यवस्तीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर एक विहीर आहे. काही ग्रामस्थ त्या विहिरीजवळून जात असता विहिरीतून कसलातरी आवाज त्यांना आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता रानगवा असल्याचे दिसून आले.
आंगलेचे ग्रामपंचायत सदस्य योगेश प्रभूलकर यांनी याबाबतची माहिती राजापूर वन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे, चिपळूणचे रामदास खोत, वि. द. झाडे, राजापूरचे वनरक्षक सागर गोसावी, चिपळूण येथील फिरत्या पथकाचे परिक्षेत्र वनाधिकारी रमेश कांबळे, रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रियांका लगड, दीपक खाडे हे आंगले येथे दाखल झाले. ग्रामपंचायत सदस्य योगेश प्रभूलकर, आयुब मीर, बाळा लाड या स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना मदत केली.
गव्याला बाहेर काढण्यासाठी बनविण्यात आला पर्यायी मार्ग
दरम्यान, ही विहीर सुमारे बारा ते पंधरा फूट खोल आहे, आतमध्ये तीन फूट पाणी असल्याने गव्याला बाहेर काढणे अवघड होते. त्यामुळे गव्याला बाहेर काढण्यासाठी एका बाजूने खोदकाम करून गव्याला बाहेर काढण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आला. मात्र, जेसीबी येण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले कार्मचारी व तेथे आलेल्या ग्रामस्थांसह त्या विहिरीच्या एका बाजूने खोदण्यास सुरुवात केली. गव्याला बाहेर येण्यासाठी योग्य असा मार्ग बनविण्यात आला. त्यानंतर तयार केलेल्या त्या पर्यायी मार्गाद्वारे आत पडलेला रानगवा विहिरीतून वर आला आणि जंगलाच्या दिशेने निघून गेला.