रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खरी लढत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात आहे. आम्ही कमीतकमी १० ते १२ हजार मतांच्या फरकाने निवडून येऊ, असा विश्वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकरांनी व्यक्त केला. काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्याबद्दल लोकांची असलेली नाराजी काँग्रेसच्या पथ्थ्यावर पडेल. सिंधुदुर्गात काँग्रेस आणि शिवसेनेला समसमान मते मिळतील तर लांजा, संगमेश्वर आणि चिपळुणात काँग्रेस आघाडीवर राहील, अशी मतांची गोळाबेरीजही त्यांनी यावेळी मांडली. या निवडणुकीसाठी काँग्रेसला मनुष्यबळ कमी पडल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. मतदान केंद्रांवर आवश्यक त्या प्रमाणात बुथ उभारण्यात आले नाहीत. तरीही काँग्रेसची पारंपरिक मते आणि भंडारी समाजबांधवांनी दिलेली साथ या जोरावर आपण निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला कुमार शेटे्ये, अशोक जाधव, हारिस शेकासन, कपिल नागवेकर आदी उपस्थित होते. दरम्यान नविनचंद्र बांदिवडेकरानी मतदारांचेही आभार मानले.