रत्नागिरी - तालुक्यातील साखरतर येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर यंत्रणा अलर्ट झाली आहे. आरोग्य विभागाकडून गावांमध्ये सर्वे सुरू करण्यात आला आहे. साखरतरमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले असून साखरतर पासून 3 कि मी परिसर कोरोना बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील साखरतर गावातील एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्याने या ठिकाणापासूनचे ३ किमी क्षेत्र कोरोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात साखरतर, कासारवेली, काळबादेवी, बसणी, म्हामुरवाडी, केळ्ये(काही भाग), मजगाव, शिरगाव, आडी हे भाग येतात. या परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना सदर क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
या परीसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरोना बाधित महिला गावातील ज्या डॉक्टरांकडे गेली होती त्या डॉक्टर्ससह डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती गोळा केली जात आहे. साखरतर मध्येच वास्तव्यास असताना त्या महिलेला कोरोनाची लागण कशी झाली याचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे.