रत्नागिरी - संपूर्ण राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले स्वयंभू मार्लेश्वर मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून (बुधवारी) दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कार्यवाही केली जात असल्याचे देवस्थान समितीमार्फत सांगण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली असून सार्वजनिक पर्यटनस्थळे व धार्मिकस्थळे अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि पावस पाठोपाठ आता संगमेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिर बुधवारपासून भाविक आणि पर्यटकांसाठी अनिश्चित कालावधीकरिता बंद करण्यात आले आहे.
हेही वाचा - कोरोना व्हायरस: गणपतीपुळे मंदिर आजपासून बंद...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यानुसार संगमेश्वर तालुक्यातील स्वयंभू मार्लेश्वर मंदिर अनिश्चित कालावधीकरीता बंद ठेवण्यात येणार आहे. मार्लेश्वर देवस्थान तालुक्यातील देवरूख शहरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर व सह्याद्रीच्या कडेकपारीत एका गुहेत वसलेले स्वयंभू देवस्थान आहे. मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो भाविक मार्लेश्वर तीर्थक्षेत्री येत असतात. तसेच येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठीही हजारो पर्यटक याठिकाणी भेट देतात. मात्र, आता हे स्वयंभू मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.